नांदेड १३ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक महेश पाटील यांनी हादगाव व अर्धापूर तालुक्यांचा दौरा करून विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पाटनूर आणि लोणी गावांतील कामांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या, तसेच शाळा व अंगणवाड्यांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
विभागनिहाय कामांचा सविस्तर आढावा हादगाव पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत सीईओ महेश पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, व्हीबी-जी-रामजी, रामाई आवास योजना, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन यासह विविध विभागांच्या योजनांची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी त्यांनी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. १५ ऑगस्ट रोजी गावस्तरावर होणाऱ्या ग्रामसभेत शासनाच्या योजनांची माहिती देणे, घरकुल योजनांच्या अंतिम याद्या वाचून दाखवणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृती करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १६ व्या वित्त आयोगांतर्गत विकास आराखडे वेळेत पूर्ण करणे, वेळेत लेखापरीक्षण करणे आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.
अर्धापूर पंचायत समितीत आढावा बैठक यानंतर अर्धापूर पंचायत समिती येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यामध्ये घरकुल योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतानाच, अंगणवाडी विकासासाठी वित्त आयोगाच्या १० टक्के निधीतून आवश्यक ती तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रत्यक्ष पाहणी, लाभार्थी व विद्यार्थ्यांशी संवाद दौऱ्यादरम्यान सीईओ महेश पाटील यांनी अर्धापूर तालुक्यातील पाटनूर ग्रामपंचायत, लोणी खुर्द व लोणी बुद्रुक या गावांना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या सेग्रिगेशन शेडची पाहणी केली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन बालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सिमेंटच्या विटांचा वापर; खर्चात बचत – लाभार्थ्याचा अनुभव पाटनूर येथील ‘प्रधानमंत्री आवास योजने’चे लाभार्थी नागेश भगवान बिऱ्हाडे यांच्याशी सीईओ महेश पाटील यांनी संवाद साधला. यावेळी बिऱ्हाडे यांनी सांगितले की, घरकुलाच्या बांधकामासाठी पारंपरिक भाजलेल्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वापर केला. यामुळे सिमेंट व वाळूची बचत झाली, वाहतूक खर्च कमी झाला आणि तुलनेने विटा स्वस्त मिळाल्याने एकूण बांधकाम खर्चात मोठी बचत झाली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती या संपूर्ण दौऱ्यादरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, हादगावचे गटविकास अधिकारी डी. के. आडेराघो, अर्धापूरचे गटविकास अधिकारी यू. डी. तोटवाड यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, उपअभियांता, विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.












