नांदेड १३ ऑगस्ट (प्रतिनिधी : माधव वाघमारे) पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. सुखबीर सिंह बादल नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्यावर एका शिख सेवादाराने खंजीरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या हल्ल्यात श्री. बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १:५० वाजता मा. सुखबीर सिंह बादल हे मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट येथील गुरुद्वारा माता साहेब देवाजी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन पूर्ण करून पायऱ्यांवरून खाली उतरत असताना अचानक एका शिख सेवादाराने त्यांच्यावर खंजीरने वार केला.
पोलीस निरीक्षक संतोष केंद्रेंचा धाडसी बचाव
हल्ल्याच्या वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले SPU चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष केंद्रे यांनी तात्काळ मध्यस्थी करत श्री. बादल यांचा बचाव केला. या झटापटीत पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याही हाताला दुखापत झाली आहे.
दोघांची प्रकृती स्थिर, आरोपी ताब्यात
हल्ल्यानंतर जखमी झालेले सुखबीर सिंह बादल आणि पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे या दोघांना तात्काळ नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आणि चांगली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, घटना घडताच उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत हल्ला करणाऱ्या शिख सेवादाराला जागीच ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.












