प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड ४ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका ఇसमारकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.
छापा टाकून आरोपीला घेतले ताब्यात दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/रवि वाहुळे व त्यांचे पथक उपविभाग नांदेड ग्रामीण हद्दीत गस्त घालत असताना, मुदखेड येथील उमरी रोडवरील संकल्प बारसमोर एक इसम बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून दोन पंचांसोबत सायंकाळच्या सुमारास संकल्प बारसमोर अचानक छापा टाकून संशयित इसमाला शिताफीने ताब्यात घेतले.
माधव बालाजी देशमुख असे आरोपीचे नाव विचारपूस केली असता त्याने आपले नाव माधव बालाजी देशमुख (वय २७ वर्षे, व्यवसाय: चालक, रा. कृष्णानगर, मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड) असे सांगितले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कम्रेला खोचलेले विनापरवाना गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्तूल (अग्निअस्त्र) मॅग्झीनसह (किंमत अंदाजे ₹ ३०,०००/-) आणि पितळ्या धातूचे जिवंत काडतूस १ नग (किंमत अंदाजे ₹ १,०००/-) असा एकूण ₹ ३१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे हे शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.
मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या प्रकरणी पोउपनि/बळीराम दासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव बालाजी देशमुख याच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८९/२०२६ कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/अतुळ भोसले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि/रवि वाहुळे, पोउपनि/बळीराम दासरे, पोउपनि/माधव केंद्रेल व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, अवैध दारू, जुगार, गुटका, व इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.












