नांदेड १९ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणाऱ्या ३ टाटा ४०७ वाहनांवर विशेष पथकाने छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १२ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास काळेश्वर विष्णुपुरी, नवीन ब्रीज परिसरातून तीन टाटा ४०७ वाहनांद्वारे बेकायदेशीररीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) यांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, तिन्ही वाहनांमधून प्रत्येकी १ ब्रास रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. चालकांकडे वाहतुकीचा परवाना किंवा आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली असता सदर वाहतूक पूर्णपणे अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.
१२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस पथकाने जागेवरच पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त केला:
- टाटा ४०७ टेम्पो (MH 06 AG 9927): १ ब्रास रेतीसह (किंमत ₹४,०५,०००/-)
- टाटा ४०७ टेम्पो (MH 21 BH 3827): १ ब्रास रेतीसह (किंमत ₹४,०५,०००/-)
- टाटा ४०७ टेम्पो (MH 04 FJ 3960): १ ब्रास रेतीसह (किंमत ₹४,०५,०००/-)
तीन आरोपींवर गुन्हा दाखल या कारवाईत पोलिसांनी तिन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. आयूब इस्माईल शेख (वय ३७ वर्षे, रा. सेलाबनगर खडकपुरा, नांदेड) २. दिनकर सिताराम धोंडगे (वय ३६ वर्षे, रा. जुना कोठा, नांदेड) ३. किरण प्रल्हाद हानमंते (वय ३४ वर्षे, रा. तेहरानगर, नांदेड)
संबंधित आरोपींवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ९९७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोउपनि संभाजी ब्याव्हारे करत आहेत.
कारवाई करणारे पथक ही यशस्वी कारवाई नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अवधुत कळणे, महंमद गौस, पुसरी, माधव पवार व पांचाळ (सर्व नेमणूक उपविपोअ कार्यालय, इतवारा) यांनी पार पाडली.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा देत नागरिकांनी अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











