नांदेड १९ ऑगस्ट प्रतिनिधी
नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) १८ ऑगस्ट २०२६ रोजी धडक कारवाई करत आनंदनगर ते शोभानगर रोडवरील नाईक नगर चौकात छुप्या मार्गाने चालवल्या जाणाऱ्या कूटणखान्याचा (वेश्या व्यवसाय) पर्दाफाश केला.
बोगस गिऱ्हाईक पाठवून केला पर्दाफाश नाईक नगर चौकातील चौहाण यांच्या घरात आरती सोनकांबळे, तिचा पार्टनर प्रताप गायकवाड (रा. उमरी) आणि बाजीराव ताटे हे महिलांना पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
शासकीय पंचांसमक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला “बोगस गिऱ्हाईक” म्हणून पाठवण्यात आले. वेश्यागमनासाठी इसम निश्चित होताच पोलिसांनी मिळालेल्या इशाऱ्यावरून घरावर छापा टाकला.
आरोपी आणि जप्त मुद्देमाल
- निष्पन्न आरोपी: आरती विकेश सोनकांबळे (वय ३५ वर्ष, रा. गणेशनगर वाय पॉईंट, नांदेड), प्रताप संभाजी गायकवाड (वय १९ वर्ष, रा. हातनी ता. उमरी, जि. नांदेड) आणि बाजीराव ताटे (रा. राजनगर, नांदेड – फरार).
- सुटका व जप्ती: कारवाईदरम्यान कुंटणखान्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून रोकड, मोबाईल फोन आणि साहित्य असा एकूण १,०१,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ नांदेड येथे गु.र.नं. ३८६/२०२६ कलम ३, ४, ५, ६, ७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (ITPA) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या नेतृत्वात पोनि/अतुल भोसले, पोउपनि/महेश कोरे, तसेच पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, दिलीपकुमार चंचलवार, मनोज राठोड (स्थागुशा) आणि महिला पोउपनि/अश्विनी गायकवाड, पोलीस अंमलदार मोरे, केन्द्रे (AHTU) यांच्या पथकाने पार पाडली.
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड











