नांदेड ११ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून चालणारा बेकायदेशीर वाळू उपसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा महसूल बुडवून होणारी चोरटी वाहतूक मुळासकट मोडून काढण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ व धडक मोहीम राबवून वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.
जिल्हाधिकारी मा. राहुल कार्डिले व पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून एकूण १३ कोटी १२ लाख ०१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच नष्ट करण्यात आला आहे.
एकाच दिवशी व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, ६ पोलीस उप अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाख सह मुदखेड, उस्माननगर, नांदेड ग्रामीण, नायगाव, लिंबगाव आणि धर्माबाद या सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकातील ३० पोलीस अधिकारी, १२१ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड, आणि ०२ आर.सी.पी. प्लाटुन यांनी नदीपात्रातील वाळू उपसा केंद्र तसेच रस्त्यांवरील वाहतुकीवर एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईदरम्यान वाळू माफिया, चालक व वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस ठाणेनिहाय झालेल्या प्रमुख कारवाया:
- १. मुदखेड पोलीस ठाणे: गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करून अवैध वाळू उपशासाठी सज्ज असलेल्या अवजड यंत्रसामग्रीवर कारवाई केली. यात १३ मोठ्या बोटी (रु. ३.९० कोटी), ०५ छोट्या बोटी (रु. १ कोटी) आणि ७५ ब्रास रेती (रु. ३.७५ लाख) असा एकूण रु. ५ कोटी ११ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- २. उस्माननगर पोलीस ठाणे (कौडगाव, कामळज, येळी): नदीपात्रात छापा मारून ०८ मोठ्या बोटी (रु. २.४० कोटी), ०६ छोट्या बोटी (रु. १.२० कोटी), ७५ ब्रास रेती आणि एक पोकलेन (रु. ३५ लाख) असा एकूण रु. ३ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- ३. नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा (मार्कंड, विष्णुपुरी, पिंपळगाव निमजी, वाहेगाव, कल्लाळ, भनगी शिवार): नदीपात्रातील वेगवेगळ्या शिवारांत छापे टाकून ०५ मोठ्या बोटी, ०२ छोट्या बोटी, ४०५ ब्रास रेती व १०३ तराफे असा एकूण रु. २ कोटी ७७ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- ४. नांदेड ग्रामीण (रस्त्यांवरील अवैध वाहतूक): मुदखेड रोड, इंडियन ऑईल पंपासमोर पहाटे १० ब्रास रेतीसह २ हायवा (रु. ६५ लाख) आणि असर्जन गाव पुलाजवळ १ ब्रास रेतीसह टाटा ४०७ टेम्पो (रु. ३.०५ लाख) जप्त करून चालकांसह मालकांवर गुन्हे दाखल केले. (एकूण मुद्देमाल: रु. ६८ लाख ०५ हजार).
- ५. नायगाव पोलीस ठाणे: नाकाबंदीदरम्यान २ विना नंबरचे भारत बेंझ हायवा ट्रक व एकूण ९ ब्रास रेती जप्त करून चालक व मालकांवर गुन्हे नोंदवले. (एकूण मुद्देमाल: रु. ४० लाख ३६ हजार).
- ६. लिंबगाव पोलीस ठाणे (जागीच स्फोट घडवून उपसा यंत्रणा नष्ट): बोरगाव तेलंग येथील गोदावरी नदीपात्राच्या किनारी जुन्या गावठाणालगत बेकायदेशीर उपशासाठी लावलेले ५ इंजिन (रु. १५ लाख), ०१ मोठी लोखंडी बोट (रु. १४ लाख) व ०५ तराफे (रु. २.५० लाख) जप्त केले. (एकूण मुद्देमाल: रु. ३१ लाख ५० हजार).
- ७. धर्माबाद पोलीस ठाणे: नेहरू चौक येथे स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली १ ब्रास लाल रेतीसह जप्त करून कारवाई केली. (एकूण मुद्देमाल: रु. २.५५ लाख).
जप्त व नष्ट करण्यात आलेला एकूण मुद्देमाल:
साहित्य / वाहनेसंख्या मोठ्या बोटी२७ छोट्या बोटी१३ इंजिन०५ तराफे१०८ हायवा ट्रक०४ टेम्पो०१ ट्रॅक्टर०१ पोकलेन०१ रेती (ब्रास)५५५ ब्रास
विशेष नोंद: नदीपात्रात सापडलेल्या लोखंडी बोटी व इंजिने अत्यंत अवजड असल्याने त्यांना पात्राबाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे महसूल पथकाला पाचारण करून पंचांसमक्ष जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडवून जागीच नष्ट करण्यात आले, तसेच तराफे डिझेलच्या साहाय्याने जाळून नष्ट करण्यात आले.
कारवाई करणारे पथक व पोलिसांचा इशारा
ही धडक कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशाने आणि मा. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये शहर उपविभाग, बिलोली, इतवारा, कंधार, देगलूर उपविभागांचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमलबजावणी पथकांनी सहभाग नोंदवला.
“नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रातून बेकायदेशीर उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांची गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशी ‘विशेष मोहीम’ यापुढेही अविरत सुरूच राहील.” — पोलीस प्रशासन, नांदेड












