नांदेड १५ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी : माधव वाघमारे)
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात देशभक्तीपूर्ण आणि अत्यंत उत्साही वातावरणात मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडला. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी तंबाखूमुक्ती, मृद व जलसंधारण तसेच महिलांच्या सुरक्षेशी संबंधित ‘पॉश’ (POSH) कायद्याची सामूहिक शपथ दिली.
‘हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
’हर घर तिरंगा’ अभियानाच्या धर्तीवर जिल्हा परिषद परिसरात एक अत्यंत आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. राष्ट्रध्वजाच्या भव्य पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे फोटो काढून स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित केला.
‘उमेद’ अंतर्गत बचत गटांच्या स्टॉल्सचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांचे विशेष स्टॉल्स जिल्हा परिषद परिसरात लावण्यात आले होते. या स्टॉल्सचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगले व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या उद्योजकतेला मोठा वाव मिळाला आहे.
विद्यार्थिनींचा सहभाग अन् सुरेख सूत्रसंचालन
या सोहळ्यात जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे), नांदेड येथील सुमारे ४० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवून सोहळ्याची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी आणि सुरेख सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी आणि मिलिंद व्यवहारे यांनी केले.
अधिकाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती
या ध्वजारोहण सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गीरी व अमित राठोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड उपस्थित होते.
तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, व्यंकटराव चव्हाण, नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












