नांदेड १५ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत मंगलसूत्र चोरी करणाऱ्या आरोपीसह त्याच्या साथीदारांना पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचे १० ग्रॅम सोन्याचे लगत (मंगलसूत्र), ०१ लॅपटॉप आणि ०१ मोटारसायकल असा एकूण १,६६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे नांदेड आणि सातारा जिल्ह्यातील एकूण तीन गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी महिला बसवेश्वर चौक, कॅनॉल रोड भागातून देवदर्शनासाठी जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगलसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४२०/२०२६, कलम ३०९(४) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१०० हून अधिक CCTV फुटेजची तपासणी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व त्यांच्या पथकाने तपास चक्र वेगाने फिरवली. नांदेड शहरातील सुमारे १०० पेक्षा जास्त ठिकाणचे CCTV फुटेज तपासून, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मुख्य आरोपी आदर्श उर्फ कुणाल श्रीराम लालमे (वय १९ वर्षे, रा. विष्णुनगर, नांदेड) यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत त्याचा साथीदार साईनाथ रमेश वाघमारे (वय २१ वर्षे, रा. हमालपुरा, विष्णुनगर, नांदेड) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल
आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्ह्यांची कबुली दिली:
- भाग्यनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ४२०/२०२६): महिलांचे सोन्याचे मंगलसूत्र चोरी.
- शिवाजीनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ३४५/२०२६): गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न.
- भाग्यनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. ५०४/२०२६): संदीपणी शाळेजवळ एका अल्पवयीन मुलीच्या कानातील बाली चोरी.
- शिरवळ पोलीस ठाणे, जि. सातारा (गु.र.नं. १७४/२०२६): आरोपीच्या घरातून जप्त केलेला लॅपटॉप हा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून घरफोडी करून चोरल्याची कबुली.
तपास पथकाची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक संतोष तांबे (भाग्यनगर ठाणे) आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख तसेच पोलीस अंमलदार विशाल माळवे, राजीव घुले, राहुल लाठकर, अदनान पठाण, रमेश सूर्यवंशी, विष्णुकांत मुंडे, सुधाकर मरदेडे, व्यंकट गंगुलवार, अंकुश कांबळे आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण यांनी पार पाडली.
सध्या आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून भाग्यनगर पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.












