नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | दि. १६ फेब्रुवारी
इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडत असताना जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थेची कसून पाहणी करण्यात आली. याच अनुषंगाने राहुल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट देत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला.
या भेटीदरम्यान परीक्षा केंद्रावर गंभीर स्वरूपाच्या अनियमितता उघडकीस आल्या. उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरीत्या जमा करण्यात न आल्याची मोठी चूक आढळली. याशिवाय, परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांकडे आवश्यक ओळखपत्रे नसल्याचेही निदर्शनास आले. या सर्व बाबी गंभीर मानून संबंधित केंद्रप्रमुखांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली ड्युअल डेस्क व्यवस्था नसल्याची बाबही समोर आली. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे झालेल्या या दुर्लक्षाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अनेक संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांमार्फत काटेकोर निगराणी ठेवण्यात येत असून, झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातूनही चित्रीकरण करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे परीक्षा व्यवस्थेत शिस्त व पारदर्शकता राखली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.












