नांदेड २४ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या एका खळबळजनक खुनाच्या प्रकरणातील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वडगाव शिवारात सापळा रचून ही कारवाई केली.
नेमकी घटना काय होती?
८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत बालाजी पुयड यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी संगनमत करून तक्रारदाराच्या भावास लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि धारदार खंजरने पाठीवर, गळ्यावर व छातीवर वार करून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपी तेव्हापासून फरार होते.
अशी झाली अटक
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष आदेश दिले होते. दरम्यान, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, यातील दोन आरोपी वडगाव येथील शेत शिवारात लपून बसले आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने वडगाव शिवारात धाड टाकली आणि शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) शिवहार साहेबराव पुयड (वय २८ वर्षे, रा. वडगाव)
२) चंद्रकांत गणेश सपुरे (वय ३० वर्षे, रा. वडगाव)
या पथकाने बजावली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, शेख इब्राहीम, विनोद पवार, मारोती पंचालिंग, समीर अहमद, शंकर माळगे, धम्मपाल कांबळे, सचिन चावरे आणि शिवानंद कानगुले यांच्या पथकाने केली.
सध्या या आरोपींना पुढील तपासासाठी तपास अधिकारी सपोनि गढवे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.












