नांदेड::२६ प्रतिनिधी
विद्यार्थिनींची सुरक्षा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलीस दलाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘दामिनी पथका’च्या माध्यमातून शहर आणि परिसरातील शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, टवाळखोरी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल २५१ केसेस दाखल करण्यात आल्या असून टवाळखोरांकडून ३५,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शाळा-महाविद्यालयांना भेटी आणि जनजागृती
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या ‘शहर दामिनी पथक’ आणि ‘इतवारा दामिनी पथका’ने शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान स्वसंरक्षण आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली. “कुठल्याही प्रकारचा त्रास, छेडछाड किंवा गैरवर्तन झाल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन दामिनी पथकाद्वारे करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी उभे राहून टवाळक्या करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. यामध्ये:
- महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार: २५१ केसेस.
- मोटार वाहन कायद्यानुसार: १९ केसेस.
- एकूण दंड: ३५,५००/- रुपये.
५० हून अधिक संस्थांची तपासणी
टवाळखोरीला आळा बसावा यासाठी शहरातील ५० पेक्षा अधिक शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस आणि लॉजेसची कसून तपासणी करण्यात येत आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ही सर्व कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना आवाहन:
“कोणत्याही संशयास्पद हालचाली, छेडछाड किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. पोलीस प्रशासन आपल्या सेवेत सदैव तत्पर आहेवृत्त संकलन:
प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड












