नांदेड ८ मे प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि आरडाओरड करून शांततेचा भंग करणाऱ्या २१ इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११०/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ आणि ‘दामिनी पथका’द्वारे ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
विविध भागात झालेली कारवाई:
१) भाग्यनगर परिसर: अशोक नगर, सत्कार वाईन शॉप आणि कृष्णा मंगल कार्यालय परिसरात ७ इसमांवर कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील हॉटेल आणि शाळा-कॉलेज परिसराचीही पाहणी करण्यात आली.
२) शिवाजीनगर: विसावा गार्डन आणि ज्योती टॉकीज परिसरात ३ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले.
३) वजिराबाद: कलामंदिर मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांततेचा भंग करणाऱ्या ३ इसमांवर कारवाई झाली.
४) नांदेड ग्रामीण: एमआयडीसी भागात गस्त घालत असताना ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
५) दामिनी पथकाची कामगिरी: महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दामिनी पथकाने विसावा गार्डन आणि हर्षनगर भागात आरडाओरड करणाऱ्या ४ जणांवर शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करू नये किंवा अशा कृत्यांना प्रोत्साहन देऊ नये. शहरात शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे. ही कारवाई सपोनि भागवत नागरगोजे, चार्ली पोलीस अंमलदार आणि दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.












