नांदेड १९ जुलै रविवार २०२६
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत वजीराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाने १८ जुलै २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सलग प्रभावी कारवाया करून विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टाटा ४०७ टेम्पो जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: महावीर चौक परिसर
पहिली कारवाई वजीराबाद पोलीस स्टेशन गुन्हा क्र. ३७२/२०२६ अंतर्गत महावीर चौक येथील महादेव मोबाईल शॉपीजवळ करण्यात आली. १८ जुलै रोजी दुपारी १५:४० वाजण्याच्या सुमारास विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो ४०७ (क्रमांक MH-43-AD-1056) पकडण्यात आला. या प्रकरणी चालक आकाश संजय माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम कलम ४७ (७)(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई: हस्नापूर रोड परिसर
दुसरी कारवाई वजीराबाद पोलीस स्टेशन गुन्हा क्र. ३७३/२०२६ अंतर्गत शाहीन फंक्शन हॉलसमोर, हस्नापूर रोड येथे करण्यात आली. सायंकाळी १८.३० वाजण्याच्या सुमारास विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा दुसरा टाटा ४०७ टेम्पो (क्रमांक MH-04-FJ-3115) जप्त करण्यात आला. या कारवाईत चालक शेख अमजद शेख रहिम व वाहन मालक दिलीप बापूराव माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
या दोन्ही कारवायांमध्ये वजीराबाद पोलिसांनी एकूण ७,००,०००/- रुपये किमतीची दोन टाटा ४०७ वाहने आणि अंदाजे २.५ ब्रास वाळू (किंमत ७,०००/- रुपये) असा एकूण ७,०७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
सदरची धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अजित कुंभार, पोउपनि/सुनील बुलंगे व डी.बी. पथकातील पोहे/शिवसांब मठपती, पोहेकॉ/हबीब चाऊस, पोकॉ/विलास कदम, गणेश धुमाळ, गुरुदिप सरदार, भाऊसाहेब राठोड, संतोष पोकळे, संतोष पावडे, ज्वालासिंग बावरी आणि इम्रान पठाण (पो.स्टे वजीराबाद) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना आवाहन:
नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन अथवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.विशेष रिपोर्ट: प्रतिनिधी माधव वाघमारे












