दिनांक १४ नोव्हेंबर
प्रतिनिधी: माधव वाघमारे (नांदेड)
नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. किनवट तालुक्यातील मौजे सिंगरवाडी शिवारामध्ये एका शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर छापा टाकून ९,२४,०००/- रुपये किमतीची १८ किलो ४८० ग्रॅम वजनाची २६ गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
गोपीयुक्त माहितीच्या आधारे कारवाई: दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडचे पोउपनि/ माधव केंद्रे व त्यांचे पथक किनवट व माहूर उपविभागात अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान किनवट येथील धार गावाजवळ असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजे सिंगरवाडी (ता. किनवट) शिवारामधील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची जोपासना केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडून कायदेशीर कारवाईची परवानगी घेण्यात आली. राजपत्रित अधिकारी व दोन शासकीय पंच आणि फोटोग्राफर यांना सोबत घेऊन सायंकाळच्या सुमारास सिंगरवाडी शिवारालगत असलेल्या शेत गट क्रमांक ४२ मध्ये छापा टाकण्यात आला.
कपाशी आणि मिरची पिकात लावला होता गांजा: सदर शेतात कापूस आणि मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने शेतातून लहान-मोठी एकूण २६ हिरवी गांजाची झाडे जप्त केली. इलेक्ट्रॉनिक वजन काठ्यावर मोजमाप केले असता त्यांचे एकूण वजन १८ किलो ४८० ग्रॅम भरले, ज्याची बाजारातील किंमत ९,२४,०००/- रुपये इतकी आहे.
आरोपी गजाआड: या प्रकरणी शेतमालक दत्ता खंडू जाधव (वय ३५ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. सिंगरवाडी, ता. किनवट, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन किनवट येथे गु.र.नं. ३३५/२०२६ कलम ८(ब), २० (अ) (II) एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. संदीप जाधव, श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुळ भोसले पोलीस निरीक्षक/जगदीश मंडलवार, पोउपनि माधव केंद्रे, पोउपनि बळीराम दासरे दिलीप कुमार चंचलवार देविदास चव्हाण ज्ञानोबा कवठेकर रितेश कुलथे सिद्धार्थ सोनसळे मुंडे वाघमारे आत्माराम कुडमेथे जाधव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार आणि किनवट पोलीस स्टेशनचे कर्मचारी, राजपत्रित अधिकारी बालाजी फोले (नायब तहसीलदार, किनवट), शासकीय पंच व फॉरेन्सिक टीमने पार पाडली. नांदेड जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.












