नांदेड २१ ऑगस्ट (प्रतिनिधी)
मुखेड तालुक्यातील मौजे लादगा शिवारात जुन्या रागातून ६० वर्षीय वृद्धाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आणि त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुखेड पोलिसांनी अवघ्या ५ तासांत शिताफीने अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी व क्रूर हत्याकांड या प्रकरणातील फिर्यादीने आरोपी किशन राजकुमार जोगदंड (रा. दापका राजा) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी चाकूर पोलीस ठाण्यात (जि. लातूर) बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याच रागातून दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११:०० वाजता मौजे लादगा शिवारातील शेतात आरोपी किशन जोगदंड याने आपल्या इतर दोन साथीदारांसह संगनमत करून फिर्यादीचे वडील बाबू पुंडलिक गायकवाड (वय ६० वर्षे) यांच्या डोक्यात चाकूने गंभीर वार करून त्यांची जागीच हत्या केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या आईच्या तोंडावरही चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
५ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर (बिलोली) आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ (देगलूर) यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या आधारे शोधमोहीम राबवून अवघ्या ५ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १. किशन राजकुमार जोगदंड (वय २२ वर्षे, रा. दापका राजा) २. सोहम सुंदरसिंग बयास उर्फ सोन्या (वय १९ वर्षे, रा. मुखेड) ३. मंगेश निवृत्ती लिंगे (वय ५० वर्षे, रा. मुखेड)
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१), ३५१(२), ३५१(३), ३(५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, सपोनि गोविंद खैरे, पोउपनि महेश कोरे, पोउपनि साईनाथ पुयड तसेच मुखेडचे पोलीस निरीक्षक चिंतातंबर कामठेवाड, पोउपनि गणेश माने, अभिजित तुतुरवाड, संदीप यामावार आणि सायबर पोलीस ठाण्याचे राजेंद्र सिटीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












