नांदेड २० ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून म्हैस चोरीला गेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना निष्पन्न करून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली म्हैस जप्त करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय? जानापुरी येथील रहिवासी असलेल्या फिर्यादींच्या शेतातील गोठ्यात बांधलेली म्हैस दिनांक ७ ऑगस्ट २०२६ च्या रात्री ९:३० ते ८ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी ५:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे फिरवून आरोपींना केली अटक गुन्हा दाखल होताच सोनखेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपलब्ध माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी खालील चार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले:
- दत्ता काशिनाथ कदम (वय ४० वर्ष, रा. जानापुरी, नांदेड)
- माधव शिवाजी येवले (वय ५० वर्ष, रा. जानापुरी, नांदेड)
- केशव काशिनाथ वानखेडे (वय ३५ वर्ष, रा. जानापुरी, नांदेड)
- शकील शफीसाब (वय ३५ वर्ष, रा. सोनखेड, नांदेड)
तपासादरम्यान आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील सुमारे ७०,०००/- रुपये किमतीची म्हैस पंचसमक्ष जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस पथकाची कामगिरी सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) भागवत नागरगोजे आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तीडके, विश्वनाथ हंबर्डे, उत्तम देवकत्ते, केशव मुंडकर, शंकर याबाजी व रेजीतवाड (सर्व नेमणूक पोलीस ठाणे सोनखेड) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.












