प्रतिनिधी माधव वाघमारे २३ ऑगस्ट
: नांदेड शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ATM फोडून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आंतरराज्यीय टोळीचा शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून दोघांना घटनास्थळावरून रंगेहात अटक करण्यात आली आहे, तर अन्य तिघे टाटा नेक्सॉन गाडीतून फरार झाले आहेत.
नेमकी घटना काय? नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, वसंतराव नाईक पुतळ्याजवळील ATM मशीन फोडण्याच्या प्रयत्नात मेहंदी रंगाच्या टाटा नेक्सॉन गाडीमध्ये (Tata Nexon) ५ जण बसलेले आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पाचही जण पळून जाऊ लागले; मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना जागीच शिताफीने पकडले. उर्वरित तिघे गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले.
अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत:
- संजय साहू शिवअवतार साहू (वय १९ वर्ष, रा. सिकाटीया, जि. कानपूर, उत्तर प्रदेश)
- आदित्य राजसिंह सज्जनसिंह (वय २१ वर्ष, रा. सिकाटीया, जि. कानपूर, उत्तर प्रदेश)
या आरोपींच्या अंगझडतीत रोख १,०५० रुपये, २ मोबाईल, हातोडा, स्क्रू ड्रायव्हर आणि मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फरार आरोपींची नावे कडक चौकशीदरम्यान आरोपींनी रात्री ATM फोडून रोकड लांबवण्याची रेकी करत असल्याची कबुली दिली. तसेच फरार झालेल्या ३ साथीदारांची नावे समोर आली आहेत:
- शिववरण सिंग उर्फ सिब्बू ठाकूर पि. कुंवर बहादुरसिंग
- विश्वजित सिंग उर्फ सिप्पी ठाकूर पि. सरणामसिंग
- देवेंद्रसिंग ठाकूर (तिघेही रा. पुराईहार, जि. कानपूर, उत्तर प्रदेश)
पळून गेलेल्या गाडीमध्ये चाकू आणि दोरी असल्याचेही आरोपींनी सांगितले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल व तपास या प्रकरणी पोलीस अंमलदार पद्मसिंह कांबळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६८/२०२६, कलम ३१०(४) भारतीय न्याय संहिता (BNS – दरोड्याची तयारी करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्य्यद करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रामेश्वर वेंजने व पोलीस निरीक्षक राजेश पूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि इरफान सय्यद, पोलीस अंमलदार पद्मसिंह कांबळे, कालो, काकडे, बालाजी यादगीरवाड आणि यमलवाड यांनी पार पाडली.












