प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड (१५ ऑक्टोबर २०२६) इन्शुरन्सची (विम्याची) रक्कम उकळण्यासाठी व बँकेचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचा १६ लाख रुपये किमतीचा १४ टायरी ट्रक ७ लाख ५० हजार रुपयांना परस्पर विकून ट्रक चोरीचा खोटा बनाव रचणाऱ्या टोळीचा नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मूळ तक्रारदारासह (ट्रक मालक) त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
३ ऑक्टोबर २०२६ रोजी विजयकुमार गणपती कल्लाळे (वय ३० वर्षे, रा. बामणी (पक), ता. कंधार, जि. नांदेड) याने उस्मान नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मौजे कलंबर फाटा येथील बालाजी तोटेवाड यांच्या घरासमोरील रस्त्यावर उभा केलेला टाचा १६ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा १४ टायरी जुना वापरता ट्रक (क्र. MH 38 X 1121) त्याचा चालक बालाजी विनायक घोगरे याने परस्पर चोरून नेला असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवरून उस्मान नगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४१/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा झाला चोरीच्या नाट्याचा पर्दाफाश!
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी मालाविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी चालक बालाजी घोगरे हा विष्णुपुरी दवाखाना परिसरात फिरत आहे.
पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून चालक बालाजी विनायक घोगरे (वय ३७, रा. बामणी) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या खोट्या गुन्ह्याची कबुली दिली. हा सर्व बनाव त्याचा साथीदार माधव दत्तराम घोगरे आणि खुद्द मूळ तक्रारदार (गाडी मालक) विजयकुमार कल्लाळे यांच्यासोबत मिळून रचल्याचे त्याने कबूल केले.
कर्ज आणि चणचणीतून रचला कट
अधिक तपासात उघड झाले की, गाडी मालक विजयकुमार कल्लाळे याच्या ट्रकचे तीन महिन्यांचे हप्ते (लोन) थकीत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी गाडीचा सोलापूर येथे अपघात झाला होता. हप्ते थकल्यामुळे आणि पैशांची चणचण असल्याने मालक विजयकुमार याने चालक बालाजी घोगरेमार्फत ‘आमेर लाला’ नावाच्या इसमाशी संपर्क साधून सदर ट्रक ७,५०,०००/- रुपयांत परस्पर विकून टाकला.
विक्रीच्या एकूण रक्कमेपैकी काही रक्कम ऑनलाईन तर काही रोख स्वरूपात मालकाने स्वीकारली. यानंतर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी व विम्याचे पैसे उकळण्यासाठी गाडी चोरीला गेल्याचा बनाव करून पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली.
ताब्यात घेतलेले आरोपी:
१) विजयकुमार गणपती कल्लाळे (वय ३० वर्षे, रा. बामणी, ता. कंधार, जि. नांदेड) – मूळ तक्रारदार व कटाचा मुख्य सूत्रधार (ट्रक मालक) २) बालाजी विनायक घोगरे (वय ३७ वर्षे, रा. बामणी, ता. कंधार, जि. नांदेड) – ट्रक चालक ३) माधव दत्तराम घोगरे (वय २६ वर्षे, रा. बामणी, ता. कंधार, जि. नांदेड) – सह-आरोपी
पोलीस पथकाने आरोपी बालाजी घोगरे याच्याकडून दोन पंचांसमक्ष २,००,०००/- (दोन लाख रुपये) रोख रक्कम जप्त केली आहे. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उस्मान नगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.
पोलीस पथकाचे अभिनंदन
सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व पोलीस अंमलदार कलंदर, राठोड, यादव व अकबर पठाण यांच्या पथकाने पार पाडली.












