नांदेड – दि. ६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करून त्याची साठवण व चोरटी विक्री करणाऱ्या टोळीवर मध्यरात्री छापा घालत मोठी कारवाई केली. या कारवाईत टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करून अंदाजे ४ लाख रुपये किंमतीची वाळू तसेच सुमारे ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईची पार्श्वभूमी
नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयास मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक मा श्री अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते सुमारास १२.४० च्या दरम्यान पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. सुपारसा शिवारात संशयित टेम्पो आढळून आला. तपासात टेम्पो MH-48-T 0529 मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठवून नेली जात असल्याचे आढळले.
पोलिसांची तडफदार कामगिरी
अवैध वाळू उपशाच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हे ऑपरेशन महत्त्वाचे मानले जात आहे. या गुन्ह्यातील आरोपीविरोधात भादंवि कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कलम ४८(७)(८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सुरू
जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून आरोपीची चौकशी सुरू आहे. अवैध वाळू व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
ही कारवाई नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांविरुद्ध पोलीस यंत्रणा सक्रिय असल्याचे प्रत्यंतर आहे.












