नांदेड दि.08 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी जोमाने आटोक्यात आणण्यासाठी आणि समाजामध्ये निर्भय वातावरण निर्माण व्हावे म्हणून नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर व सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सतत व आदतन गुन्हे केलेल्या 03 आरोपींवर जिल्हाधिकारी समिती मार्फत एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात आले आहे.
एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या आदतन गुन्हेगारांची नावे
- अनिल उर्फ अनिल पंजाबी पि. सुरेश पवार (वय २४, व्यवसाय बेकार, राहणार गोविंदनगर, नांदेड)
- अनिल मारोती बुद्रुक(वय २३, व्यवसाय खाजगी चालक, राहणार पांगरी , ता. लोहा, जि. नांदेड)
- महादू शिवबा नरंगले (वय ४५, व्यवसाय बेकार, राहणार शेवडी बा, ता. लोहा, जि. नांदेड)
या आरोपींविरुद्ध वारंवार गंभीर व स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून, स्थानिक पोलिस स्टेशन स्तरावरुन त्यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वडाखेडे साहेब यांनी तीव्र कारवाईचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षकांचे निर्देश
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्हेगारी पूर्णपणे मोडण्याचा संकल्प व्यक्त केला असून, गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
तसेच उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, एसीपी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने ही प्रक्रिया राबवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत ८ महिन्यात एमपीडीए अंतर्गत एकूण २२ गुन्हेगारांवर कारवाई केली गेली असून गुन्हेगारीला कोणत्याही प्रकारे वाव देणार नाही, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली आहे.
नांदेड जिल्हा पोलिसांकडून जनतेला आवाहन
“गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांना अजिबात पाठीशी घालू नका. संशयित हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्या. आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल.”












