नांदेड, दि. ९ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी “ऑपरेशन फ्लॅश आऊट” अंतर्गत मोठी मोहिम राबवून निर्णायक कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी मास रेड आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक (भोकर) सौ. श्री अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ग्रामीण पोलिस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या मास रेड दरम्यान अवैध दारू निर्मिती, विक्री व हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत नांदेड जिल्ह्यात एकूण 67 गुन्हे नोंदवून 67 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून एकूण 1,67,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.












