नांदेड, दि. 13 नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड पोलिस आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हबीब टॉकीज चौक ते देगलूर नाका या मार्गावरील अवैध अतिक्रमणधारकांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. शहरात वाहतूक कोंडीची समस्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिक व वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली.
आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पोलिस निरीक्षक श्री. गहिलोटे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या पथकांनी हबीब टॉकीज चौक ते देगलूर नाका मार्गावरून अवैध अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान रस्त्यावरील अवैध बांधकामे, फळटप्या, गाड्या, फलक, बॅनर आदी हटविण्यात आले. सुमारे 35 ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले, तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
या कारवाईत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. जगन्नाथ सिंग, दोन अधिकारी व 20 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तसेच नांदेड पोलिस विभागातील उपअधीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक राकेश गहिलोटे, संजय शिंदे आणि वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की,
“शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”












