नांदेड | दि. २३ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात बँक लिफ्टिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस स्टेशन वजीराबाद यांच्या संयुक्त कारवाईत आंतरराज्य बँक लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपींकडून एकूण १८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री (वय ४५), अजय बाबू जाधव उर्फ अजय फकीरा नाईक, नंदकुमार दिलीप चंद्र उर्फ शंकर राजू भोई आणि अंजली ओमप्रकाश छत्री (सर्व रा. नूतनगुंज नगर, बसवन्ना भवानी जिल्हा शिमोगा, कर्नाटक) या चार आरोपींचा समावेश आहे.
पोलीस तपासादरम्यान बँक परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज, ५० जणांचे फूटप्रिंट्स आणि १५ संशयितांचे नॅटग्रिड डेटाबेस तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने १८ डिसेंबर २०२५ रोजी आरोपींना ताब्यात घेऊन नांदेड येथे आणण्यात आले.
तपासात आरोपींनी बँक लिफ्टिंगद्वारे चोरी केल्याची कबुली दिली असून चोरीतील १८ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, पोलीस स्टेशन वजीराबाद हे करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर), मा. श्री. सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्रीमती अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा चे पो नि उदय खंडेराय व वजीराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.












