नांदेड २४ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
शासनाकडून घरभाडे भत्ता (एचआरए) नियमितपणे मिळत असतानाही अनेक शासकीय कर्मचारी दररोज नांदेड नांदेड हुन मुदखेड भोकर हिमायत नगर किनवट तसेच पूर्णा परभणी अपडाऊन करत असल्याचे चित्र तालुकास्तरावर दिसून येत आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
सकाळी कार्यालयीन वेळ सुरू होऊनही अनेक कर्मचारी उशिरा येतात, तर काही कर्मचारी दुपारनंतरच कार्यालयात दाखल होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. परिणामी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, फेरफार, विविध शासकीय योजना, अर्ज-प्रक्रिया यांसाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. काही वेळा “आज साहेब नाहीत”, “उद्या या” असे सांगून नागरिकांना परत पाठवले जाते.
विशेष म्हणजे एचआरए मिळत असताना मुख्यालयी वास्तव्यास न राहता अपडाऊन करणे हा नियमभंग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तरीही या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने दलालांचे फावत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातून लांबून आलेले शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या “लोकाभिमुख प्रशासन” या संकल्पनेला यामुळे तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक तपासण्या करून अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करावे तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.












