नांदेड |२५ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’अंतर्गत पोलिसांनी व्यापक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात पेट्रोलिंग वाढवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गोंधळ घालणे तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई दिनांक 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या देखरेखीखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ पथकाचे प्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे व संबंधित पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पोलीस स्टेशन भाग्यानगर
पेट्रोलिंगदरम्यान येथील चौकात एका इसमास सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दारूची बाटली व साहित्य जप्त करून कलम 68 म.प्रो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणीही करण्यात आली.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण:
एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान एका इसमास मध्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना पकडण्यात आले. त्याच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित दारू दुकाने व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
पोलीस स्टेशन इतवारा
जुना मोंढा परिसरात एका इसमास सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कलम 110/117 म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच दोन दारूच्या बाटल्या व साहित्य जप्त करून कलम 68 म.प्रो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस स्टेशन वजिराबाद
बसस्थानक परिसरात पेट्रोलिंगदरम्यान एका इसमास मध्यप्राशन करून गोंधळ घालताना पकडण्यात आले. त्याच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. यासोबतच दारू दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
दामिनी पथक
दामिनी पथकाने विसावा गार्डन परिसरात पेट्रोलिंग करत एका इसमास आक्षेपार्ह वर्तन करताना ताब्यात घेतले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे अथवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणे टाळावे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.












