नांदेड | दि. २६ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
अवैध जुगारविरोधात नांदेड पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत नायगाव तालुक्यात एकाच दिवशी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीनुसार १२ ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत एकूण ६,११,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. श्याम पानगावकर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकांनी समन्वयाने कारवाई केली.
दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजता गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सुमारे १२ जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत जुगार खेळताना रंगेहात पकडलेल्या आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६,११,८०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.












