नांदेड |२७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या आरोपीविरोधात कडक पावले उचलत पोलीस प्रशासनाने MPDA (महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेऊन लातूर येथील कारागृहात पाठविण्यात आले आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1005/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 119(1), 351(2), 351(3), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल असून, आरोपी वैभव राजू हुंडे (वय 23, व्यवसाय–मजुरी, रा. एन.डी.31, दत्त मंदिरजवळ, हडको, ता. जि. नांदेड) याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हा दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड ग्रामीण हद्दीत घडल्याची नोंद आहे.
आरोपीच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास करून प्रस्ताव सादर करण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार ही कारवाई राबविण्यात आली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नांदेड, अपर पोलीस अधीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीरीत्या पार पडली.
पोलीस प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश गेला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












