नांदेड : ८ फेब्रुवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
आमचे मित्र संतोष मुळे यांची पत्नी सौ. कविता मुळे या प्रथमच प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आल्या असून महिला (साधारण) आरक्षणामुळे त्यांची नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, अभिनंदनासोबतच नांदेडकरांच्या अपेक्षाही आता अधिक वाढल्या आहेत.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, स्वच्छता, रोजगाराच्या संधी, महिला व मुलींची सुरक्षा, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता, ओपन जिम, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि नागरिकांच्या प्राथमिक गरजा या प्रश्नांकडे नव्या महापौरांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विशेषतः नांदेड शहरात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर ठोस उपाययोजना होणे काळाची गरज आहे. शहरभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
मनपाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. आजही तरोडा परिसरात दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील सर्वात मोठ्या विष्णुपुरी पाणीप्रकल्पाच्या सान्निध्यात असूनही नांदेडकरांना एक दिवसाआड पाणी का मिळू नये, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था नांदेडकरांची झाली आहे.
मनपाच्या स्वतःच्या मालकीच्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, त्यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या अतिक्रमणांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शहरातील बॅनरबाजीमुळे नांदेडचे विद्रूपीकरण होत असून, मनपाची परवानगी न घेता लावल्या जाणाऱ्या बॅनरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न, वेतन, ठेकेदारांकडून होत असलेले दुर्लक्ष, यामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींकडे महापौरांनी विशेष लक्ष देऊन प्रत्यक्ष वॉर्डनिहाय दौरे करत नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले, तर महापौर कविता मुळे यांची लोकाभिमुख व लोकउपयुक्त नेतृत्व म्हणून ओळख निर्माण होईल आणि त्यांच्या कार्यकाळाचा वेगळा ठसा उमटेल. अन्यथा, “ये रे माझ्या मागल्या” प्रमाणे कार्यकाळ विस्मरणात जाण्याची भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत. नांदेडकरांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हेच नव्या महापौरांसमोरचे खरे आव्हान ठरणार आहे.












