प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड, दि. २७ फेब्रुवारी: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिनानिमित्त आज येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीतूनच संवाद साधण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयात मराठी साहित्य, स्पर्धा परीक्षा, इतिहास, विज्ञान यासह विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना श्री. गुरव म्हणाले, “कुसुमाग्रजांसारख्या थोर साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा समृद्ध असून तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे. आपण शक्य तितका व्यवहार मराठीतच केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने इंग्रजीचे महत्त्व वाढले असले तरी मराठीतील मान्यवर लेखक आणि कवींचे स्मरण ठेवून अवांतर वाचनाची सवय जोपासली पाहिजे.” त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा अभ्यास करण्याचेही आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कुसुमाग्रजांसह इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले असून ते वाचकांच्या भेटीसाठी खुले करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार विकास बिरादार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, श्रद्धा रनखांबे, दिगांबर शिंदे, रघुवीर श्रीरामवार, राजू पाटील आदींनी परिश्रम घेतले.












