प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड :३ मार्च हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलामुळे अन्य तीन गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार ३ मे २०२६ पासून या गाड्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
यामध्ये रायचूर – परभणी दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक १७६६३ च्या परभणी येथील आगमनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ही गाडी परभणीला ६.४० वाजता पोहोचते, ती आता ६.५५ वाजता पोहोचेल. तसेच धर्मबाद – मनमाड मराठवाडा एक्सप्रेस (गाडी क्र. १७६८८) च्या मनमाड येथील वेळेत सुधारणा करण्यात आली असून, ही गाडी सध्या १३.२५ वाजता पोहोचते ती आता १३.४० वाजता पोहोचेल.
सर्वाधिक बदल हिंगोली – मुंबई जन शताब्दी (गाडी क्र. १२०७२) च्या वेळापत्रकात करण्यात आले आहेत. या गाडीच्या हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर आणि जालना या स्थानकांवरील आगमन-प्रस्थानाच्या वेळेत पुढे-मागे फरक करण्यात आला आहे. प्रवाशांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.












