नांदेड 12 मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण ५६,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी बोहार बायपास परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून गाडेगाव परिसरात संबंधित संशयिताला ताब्यात घेतले.
असा आहे जप्त केलेला मुद्देमाल:
संशयित आरोपी जळबा गंगाधर मेकाले (वय २६, रा. पिंपळगाव (महादेव), ता. अर्धापूर) याच्याकडे केलेल्या तपासणीत पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला:
- देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ (१८० मिली) च्या ९६ सिलबंद बाटल्या (किंमत ७,६८० रुपये).
- देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ (९० मिली) च्या १०० सिलबंद बाटल्या (किंमत ४,००० रुपये).
- एक टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी (क्रमांक MH-26 CN-5140, किंमत ४५,००० रुपये).
पोलीस पथकाची कामगिरी:
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे इतवारा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सुनील भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शेख सत्तार करत आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.












