किनवट १९ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे) : नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत किनवट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध रित्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम उघडत पोलिसांनी धानोरा ता. किनवट येथून सुमारे ९ लाख ७२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीवरून टाकली धाड
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, किनवट पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास मौजे धानोरा येथे छापा टाकला. यावेळी आरोपीच्या राहत्या घरासमोर एक संशयास्पद महिंद्रा बोलेरो वाहन (क्र. MH-26-BC-1006) मिळून आले. या वाहनाची आणि घराची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी या कारवाईत खालील प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला आहे:
- राज निवास पान मसाला, गोवा गुटखा, विमल पान मसाला.
- अनारपान मसाला तंबाखू, नजर पान मसाला, झेड.एन. जाफरानी जर्दा.
- V1, G-1, N-5 आणि SR-1 टोबॅको तसेच धारीवाल पान मसाला.
- एकूण गुटखा किंमत: ४,७२,४८० रुपये.
- महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये.
- एकूण जप्त मुद्देमाल: ९,७२,४८० रुपये.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी वाहिद मजीद मोमीन (रा. धानोरा, ता. किनवट) याला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी अमेर सय्यद खम्मर सय्यद (रा. हिमायतनगर) याचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, सपोनि सागर झाडे, पोलीस अंमलदार आत्राम, डुकरे, अन्नमवार आणि कुडमेते यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि फडेवार हे करीत आहेत.












