नांदेड: २६ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक खंजीर असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने, २५ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. विमानतळ ते शिवमंदीर जाणाऱ्या रोडवरील आसरा नगर येथे दोन इसम अवैध शस्त्रे विकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलिसांनी संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, सय्यद शाहेद उर्फ पटेल (वय २२ वर्षे, रा. रहिमपूर, वसरणी) याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. तर त्याचा साथीदार दीपक उर्फ छक्या विनोद भोकरे (वय २६ वर्षे, रा. कौठा, नांदेड) याच्याकडे एक लोखंडी खंजीर सापडला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, ही शस्त्रे त्यांनी निखिल उर्फ चिंट्या रमेश घोरपडे (रा. वसरणी) याच्याकडून विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक महेश कोरे आणि पोलीस अंमलदार माधव माने, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकत्ते व महेश बडगु यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे












