नांदेड:२६ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवायांचा वेग वाढवला आहे. याच मोहिमेअंतर्गत, माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शेख जावेद शेख जलील (रा. पडसा) याला नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.
वारंवार गुन्हे केल्याने कठोर पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेख जावेद याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, रेती तस्करी, दरोडा आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
तीन जिल्ह्यांत प्रवेशावर बंदी
सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी, किनवट यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जेनित दोन्तुला यांनी २६ मार्च २०२६ रोजी आरोपीला तीन जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित केले.
आतापर्यंत १९ गुन्हेगार तडीपार
नांदेड पोलीस दलाने सन २०२६ मध्ये गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत ८ जणांवर कारवाई करण्यात आली असून, शेख जावेदसह एकूण १९ सराईत गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे.
महत्त्वाची सूचना: हद्दपार करण्यात आलेली व्यक्ती आता नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सहा महिने प्रवेश करू शकणार नाही.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे (माहूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली












