नांदेड ५ मे प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पुकारलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेला मोठे यश आले आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका तलवारीसह पिस्तुलासारखी दिसणारी एअर गन जप्त केली असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने भाग्यनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मालेगाव रोडवरील शिवरायनगर भागात एक तरुण अग्निशस्त्रासह वावरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तातडीने सापळा रचून जमीर मुक्तारखान पठाण (वय २२, रा. जवळ पाचळ, ता. कळमनुरी) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे हुबेहूब पिस्तुलासारखी दिसणारी ‘छऱ्याची बंदूक’ (Air Gun) मिळून आली. पोलिसांनी १२,०० रुपयांची ही बंदूक जप्त करून त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई: तलवारीसह दहशत माजवणारा ताब्यात
दरम्यान, पथकाला दुसऱ्या एका माहितीनुसार नेरली परिसरात एक जण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,५०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, तसेच पोलीस अंमलदार बजरंग जाधव, विशाल माळवे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मरदोडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, आदनान पठाण आणि अंकुश कांबळे यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
बातमी प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.












