नांदेड १४ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ (Operation Crack Down) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी १३ मे २०२६ रोजी विविध ठिकाणी धाडी टाकून तीन मोठे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत १७ आरोपींना अटक करण्यात आली असून ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन पथके तयार करून ही कारवाई केली
- गोपाळचावडी परिसर: येथे जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
- विष्णुपूरी (वेद बारच्या पाठीमागे) या ठिकाणी छापा टाकून ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
- मुजामपेठ परिसर: येथे ४ आरोपींना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी या तिन्ही ठिकाणांहून खालील साहित्य जप्त केले आहे:
- रोख रक्कम
- जुगाराचे साहित्य
- ४ मोटरसायकली
- ८ मोबाईल संच
- एकूण किंमत: ६,४०,६५०/- रुपये.
कारवाई करणारे अधिकारी व पथक
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण आणि नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला.
५० आरोपींविरुद्ध कारवाईचा धडाका
ऑपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू झाल्यापासून (०१ मे पासून) आतापर्यंत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या एकूण ५० आरोपींविरुद्ध १२ गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत १८ लाख ५७ हजार ०९० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.












