प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड
नांदेड १४ मे जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाष कुमार यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. १३ मे २०२६ रोजी नवा मोंढा परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना, दोन व्यक्ती संशयास्पदरित्या गावठी पिस्तूल घेऊन वावरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून चंद्रशेखर देवराव पाईकराव (वय २६) आणि प्रशिक्ष दिलीपराव ओढणे (वय २७, दोघे रा. संघसेन नगर, इतवारा, नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेले लोखंडी गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
विशेष म्हणजे, हे दोन्ही आरोपी यापूर्वी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होते. पोलीस पथक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. आता या आरोपींवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील आणि श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केली आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले असून, गुन्हेगारांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












