नांदेड १५ जून जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सायबर सेलच्या पथकाने अत्यंत गोपनीय व कौशल्याने तपास करत, गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या एका सराईत दरोडेखोराला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
१० लाख ५० हजारांची झाली होती जबरी चोरी
घटना अशी की, ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास जालना येथील व्यापारी सोहनलाल मोतीलालजी परमार यांच्या जुना मोंढा परिसरातील ‘मा. आरबुंडा ट्रेडींग’ या अडत ऑफिसमध्ये तीन अनोळखी इसम घुसले होते. त्यांनी खंजरचा (सुरा) धाक दाखवून तेथे काम करणारे शिवहार पतरावाळे यांच्याकडून तब्बल १० लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १३९/२०२६) दाखल करण्यात आला होता.
अशी झाली आरोपीला अटक
या दरोड्याच्या टोळीतील मुख्य आरोपी महेश आनंदराव शिंदे (वय २२ वर्षे, रा. शंकर नगर वसरणी, नांदेड) हा गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मिलिंद सोनकांबळे व त्यांचे पथक जुना मोंढा परिसरात त्याचा शोध घेत होते.
तपास सुरू असतानाच, पोउपनि मिलिंद सोनकांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर आरोपी हा देगलूर नाका येथील हैदर गार्डन फंक्शन हॉल समोर थांबलेला आहे. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून देगलूर नाका परिसरातून आरोपी महेश शिंदे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला पुढील कार्यवाहीसाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या पथकाने केली कामगिरी
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा.श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा.श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, एलसीबीचे अंमलदार रितेश कुलथे, अझरुद्दीन शेख, अनिल बिरादार, ज्ञानेश्वर कलंदर, संजय राठोड तसेच सायबर सेलचे दिपक ओढणे आणि राजेंद्र सिटीकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.












