नांदेड २१ जून प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अवैध गौण खनिज (रेती) उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून चोरून अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांवर पोलिसांनी धडक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी १ हायवा, १ जे.सी.बी., ७ इंजिन आणि २६ तराफ्यांसह तब्बल १ कोटी १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोदावरी नदीपात्रात पोलिसांचा सापळा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक २० जून २०२६ रोजी दुपारी ४:१० वाजेच्या सुमारास कल्लाळ टी पाॅईट व कल्लाळ, पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने या ठिकाणी योग्य नियोजन करून सापळा रचला.
या धाडसी कारवाई दरम्यान गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना रेती उपसा करणारे व हायवा, जे.सी.बी. च्या साहाय्याने वाहतूक करणारे आरोपी रंगेहात पकडले गेले.
६ आरोपींवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी ६ रेती माफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने:
१) हनुमंत चांदु वाघमारे (रा. राहुल नगर वाघाळा, नांदेड)
२) साईनाथ तरके
३) दत्ता लवांडे (रा. किवाळा)
४) बाबाराव क्षिरसागर (रा. कल्लाळ)
५) मुरली हिंमत (रा. खरबी)
६) जे.सी.बी. चालक (नाव माहीत नाही)
या सर्व आरोपींविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं ७४०/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५), सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, कलम ९, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि कलम ३, ७ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोकों/३०२३ मधुकर श्रीराम आवातिरके (वय ३८ वर्षे, नेमणूक पो.स्टे. नांदेड ग्रामीण) यांनी दिली आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: १,०१,८५,०००/- रु.)
कारवाई दरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे कोट्यवधी रुपयांचे साहित्य घटनास्थळावरून जप्त केले आहे:
- हायवा ट्रक: एक टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH 26BE5011) – ज्यामध्ये ५ ब्रास रेती भरलेली होती. (किंमत रु. ४५,२५,०००/-)
- तराफे व रेती: पाण्यात तरंगणारे २६ तराफे आणि त्यावर असलेली ५२ ब्रास रेती. (किंमत रु. १५,६०,०००/-)
- इंजिन: एकूण ७ इंजिन. (किंमत रु. २१,००,०००/-)
- जे.सी.बी. मशीन: एक जे.सी.बी. मशीन. (किंमत रु. २०,००,०००/-)
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक
ही यशस्वी आणि मोठी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव आणि उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा उप विभाग) मा. श्री. प्रशांत शिंदे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, गंगाधर भालेराव, ASI पांचाळ, पोकों/नागरगोजे, पोकों/माधव मारवाडे आणि होमगार्ड यांच्यासह सर्व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंमलदारांचा समावेश होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
वृत्त संकलन व बातमी लेखन
प्रतिनिधी: माधव वाघमारे












