नांदेड ४ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक व नगरसेविका पदासाठी अधिकृत उमेदवारांनी जनतेसमोर विकासाचा ठोस आराखडा मांडत जनसेवेचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदासाठी अॅड. कांबळे, पठाण जमीर खान अन्सार खान तर नगरसेविका पदासाठी यादव नेहा गोविंद, बेंद्रीकर नम्रता साहेबराव प्रभाकर हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांनी जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेविका पदाच्या उमेदवार यादव नेहा गोविंद यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ५ मधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची स्वच्छता व ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या यावर प्राधान्याने काम केले जाईल. तसेच शासनाच्या नवीन ‘लाडकी बहीण’ योजना, घरकुल योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
नगरसेवक पदाचे उमेदवार पठाण जमीर खान अन्सार खान खान यांनीही याच भूमिकेला दुजोरा देत सांगितले की, प्रभागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमात आहे. जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ५ चा विकास हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवला जाईल. पारदर्शक कारभार, जनतेशी थेट संवाद आणि सर्वसमावेशक विकास हाच या सर्व उमेदवारांचा मुख्य अजेंडा आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांमध्ये या जाहीर भूमिकेमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवरच कौल दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












