नांदेड: २१ एप्रिल प्रतिनिधी
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणातील दोन मुख्य फरार आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयरीत्या ही कारवाई करण्यात आली.
नेमकी घटना काय होती?
दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १:१० ते १:३० च्या सुमारास प्रफुल ऊर्फ अर्जितसिंग गजानन चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत चित्रपट पाहून बुलेटवरून घरी जात होता. कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर जवळ आरोपींनी जुन्या भांडणाची कुरापत काढून प्रफुलवर चाकू आणि तलवारीने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात प्रफुलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी यापूर्वी दोन आरोपींना (सोनू राऊत आणि साहेर) अटक करण्यात आली होती, मात्र इतर आरोपी फरार होते.
अशी झाली अटक
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच टीम तयार केल्या होत्या. तपासादरम्यान, फरार आरोपी शेख शाहरुख ऊर्फ कबुतर शेख अजगर (वय २९, रा. खुदबेनगर) आणि शेख उबेद शेख अजगर (वय २३, रा. मिलतनगर) हे शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून २० एप्रिल रोजी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
फरार राहण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई
तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपींना फरार राहण्यासाठी मन्मथ वसंतराव मंगरुळे (वय २५, रा. नायगाव) आणि दिग्विजय गणेशराव नारगुडे (वय २२, रा. शामनगर, नांदेड) यांनी मदत केली होती. पोलिसांनी त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या पथकाने बजावली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणिअप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि मिलिंद सोनकांबळे, रवी बामणे, स्वामी, अझरोद्दीन, कुलथे, बिरादार तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांच्या पथकाने केली.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे











