नांदेड |१ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाली आहे. मनपाच्या विविध प्रभागांसाठी एकूण ९३७ उमेदवारांनी १२०३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या काटेकोर छाननीनंतर ८७८ इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. तर कागदपत्रांची पूर्तता नसणे, आवश्यक दाखल्यांचा अभाव, प्रस्तावक-समर्थकातील त्रुटी आदी कारणांमुळे ५९ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने मैदानात उडी घेतली आहे. काही प्रभागांत बहुरंगी लढतीचे चित्र असून अनेक ठिकाणी थेट चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.
आता पुढील टप्प्यात उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रचाराला वेग येणार असून शहरात प्रचाराचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.












