नांदेड | १४ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नवनिर्वाचित सौ. कविता संतोष मुळे यांनी पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. शहर साखर झोपेत असतानाच आज पहाटे महापौरांनी नांदेड शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत स्वच्छता मोहिमेचा सखोल आढावा घेतला. स्वच्छतेच्या कामात कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
महापौरांनी मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच अंतर्गत गल्ल्यांमधील स्वच्छतेची पाहणी केली. विशेषतः राज कॉर्नर, चैतन्य नगर एअरपोर्ट रोड, नमस्कार चौक, रेल्वे स्टेशन परिसर व बस स्थानक परिसर या ठिकाणी स्वच्छतेच्या कामाची तपासणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. एअरपोर्ट रोडवरील उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कचरा संकलन करणाऱ्या ‘घंटागाडी’च्या वेळा, नियमितता व कार्यक्षमतेबाबत नागरिकांचे अभिप्रायही महापौरांनी ऐकून घेतले.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छता अधिकारी बालाजी देसाई, स्वच्छता निरीक्षक किशन, तारू प्रियंका एंगडे तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा नवा प्रयोग
यावेळी बोलताना महापौर सौ. कविता मुळे म्हणाल्या की, इंदौरच्या धर्तीवर नांदेड शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. स्वच्छ व सुंदर शहर उभारण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य व शुद्ध पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कचरा डेपोवरील प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
“स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित नांदेड” हेच आपले मुख्य ध्येय असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ठाम आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.












