प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड, दि. २७ फेब्रुवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाडसत्र कारवाईत अवैधरित्या धरणुती वापराचे गॅस सिलेंडरमधून अंटोमध्ये इंधन भरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत वेगवेगळ्या कंपन्यांचे ४६ धरणुती गॅस सिलेंडर, एक इलेक्ट्रिक मोटार आणि वजन काटा असा एकूण १ लाख ४८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गॅस भरणाऱ्या टोळ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना देण्यात आले होते. त्यानुसार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकाने नांदेड ग्रामीण भागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मुदखेड येथील नवी आबादी भागात शेख अय्युब शेख महेन्दू (वय ४५) हा पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या धरणुती गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने अंटोमध्ये गॅस भरत आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३५ वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी संघरत्न सूर्यकांत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शेख अय्युब याच्याकडून ४६ धरणुती गॅस सिलेंडर (किंमत १ लाख ३२ हजार ५०० रुपये), एक इलेक्ट्रिक मोटार (किंमत १५ हजार रुपये) आणि एक इलेक्ट्रिक वजन काटा (किंमत १२०० रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मुदखेड येथे गुन्हा रजि. नं. ३७/२०२६ अन्वये कलम २५७ भारतीय न्याय संहिता व सह कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मुद्देमालासह पोलीस ठाणे मुदखेडच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय तसेच पथकातील पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, माधव माने आणि सुधाकर देवकत्ते यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.












