नांदेड ११ एप्रिल प्रतिनिधी
शहरात वाढत्या चोरीच्या आणि शरीरांविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी मोहीम राबवण्यात आली. गेल्या ५ दिवसांत ९७ पेक्षा जास्त आरोपींवर कारवाई करत पोलिसांनी गुन्हेगारी जगताला मोठा दणका दिला आहे.
पहाटेच्या सुमारास ‘कोंबिंग ऑपरेशन
आज, ११ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४:०० ते सकाळी ८:०० या वेळेत संपूर्ण नांदेड शहरात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अशा एकूण २८ अधिकाऱ्यांसह १०३ अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
आकडेवारीतून मोहिमेचे यश:
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध कलमांखाली सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. मोहिमेचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत:
- चेक केलेले तडीपार गुन्हेगार: ७३
- MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार: २१
- बॉण्डचे उल्लंघन केलेले गुन्हेगार: १७
- आर्म ॲक्ट (बेकायदेशीर शस्त्रे) गुन्हेगार: ०६
विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई:
शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाग्यनगर, विमानतळ, नांदेड ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेने एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
५ दिवसांचा विशेष आढावा:
दिनांक ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवलेल्या मोहिमेत ८५ आरोपींविरुद्ध कारवाई करून ७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच:
- मपोका कलम ५५ आणि ५६/५७ नुसार ३० जणांना हद्दपार करण्यात आले.
- हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ६ जणांविरुद्ध कलम १४२ नुसार गुन्हे नोंदवले.
- नाकाबंदी दरम्यान एका इसमाकडून ५३,९८० रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.
नांदेड पोलिसांनी राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वृत्त संकलन:
प्रतिनिधी, माधव वाघमारे












