नांदेड ११ एप्रिल (प्रतिनिधी, माधव वाघमारे)
नांदेड शहर आणि परिसरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांना आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:४५ च्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज येत जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, अर्धापूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (National Center for Seismology) संकेतस्थळावरील नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाकडून मिळालेली माहिती
भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने जिल्ह्यात कोठेही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाने जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला यासंदर्भातील अहवाल सादर केला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी या घटनेची दखल घेतली असून ते प्रशासकीय यंत्रणेच्या सतत संपर्कात आहेत. “नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही जनतेला धीर देत म्हटले आहे की, “प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.”
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शक तत्वे:
प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
- छतावरील दगड काढा: ज्यांच्या घराचे छत पत्र्याचे आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी ते दगड तातडीने काढून घ्यावेत. त्याऐवजी पत्रे बोल्टने घट्ट करून घ्यावेत.
- मोकळ्या जागेचा वापर: पुन्हा जमिनीतून आवाज आल्यास किंवा धक्का जाणवल्यास तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागेत एकत्र यावे.
- संपर्क क्रमांक: आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.












