नांदेड १७ एप्रिल प्रतिनिधी
“नांदेड शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महापालिकेने तयार केलेला १०० दिवसांचा कृती आराखडा हा एक स्तुत्य उपक्रम असून, या माध्यमातून दर्जेदार सेवा वेळेत मिळणे अपेक्षित आहे,” असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
शुक्रवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी महापौर सौ. कविता संतोष मुळे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर
पालकमंत्री सावे यांनी शहर स्वच्छतेबाबत विशेष सूचना दिल्या. शहरात पूर्ण क्षमतेने ‘डोअर टू डोअर’ कचरा संकलन करण्यासाठी आवश्यकतेनुसार वाहने आणि मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा स्थळाचे सुशोभीकरण करून तेथे त्यांच्या कविता लावण्याबाबतही त्यांनी सुचवले.
डिजिटल शिक्षण आणि महिलांच्या सुविधा
महापालिका शाळांचे अद्यावतीकरण करताना ‘डिजिटल क्लासरूम’वर भर देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. तसेच शहरातील महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालयांची उभारणी प्राधान्याने करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
१०० दिवसांच्या आराखड्यात ‘या’ कामांचा समावेश:
या बैठकीत कृती आराखड्यातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने:
- गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे व डीप क्लीनिंग मोहीम.
- पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे.
- अत्याधुनिक गॅस शवदाहिनी आणि इलेक्ट्रीक चार्जर स्टेशनची उभारणी.
- धोकादायक विद्युत वाहिनी भूमिगत करणे.
- आरटीएस (RTS) अंतर्गत ७४ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणे.
शासन स्तरावर पाठपुरावा करणार
शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल, वाहतूक नियोजन, स्टेडियम उभारणी आणि मल्टीपार्किंग यांसारख्या मोठ्या प्रकल्पांबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली. महापालिकेच्या कामात येणाऱ्या प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिले.
या बैठकीस सभागृह नेते ॲड. महेश कदकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, शहर अभियंता सुमंत पाटील व महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात पण महत्त्वाचे:
“नागरिकांना विहित वेळेत सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. १०० दिवसांचा हा आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दर्जेदार पद्धतीने व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे.
अतुल सावे, पालकमंत्री, नांदेड.बातमी लेखन: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.












