नांदेड १८ प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री एका इसमावर धाड टाकून त्याच्याकडून बेकायदेशीर रित्या बाळगलेली तलवार आणि खंजर जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, १६ एप्रिल रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, हिलाल नगर गल्लीतील रोडवर एक तरुण हातात तलवार आणि कमरेला खंजर खोचून उभा आहे.
मध्यरात्री पोलिसांचा छापा
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना बोलावून १७ एप्रिलच्या पहाटे ००:१० वाजेच्या सुमारास हिलाल नगर भागात छापा टाकला. यावेळी संशयास्पद रित्या फिरणाऱ्या शेख इरफान शेख इब्राहिम (वय २९ वर्षे, रा. पाकीजानगर, नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक लोखंडी तलवार आणि एक लोखंडी खंजर मिळून आला. पोलिसांनी ७०० रुपये किमतीचे हे दोन्ही शस्त्रे जप्त केली आहेत.
गुन्हा दाखल व पुढील तपास
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर अहमद शब्बीर अहमद यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख इरफान याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१०/२०२६ कलम ४/२५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मांजरमकर करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार समीर अहमद, मारोती पचर्लिंग, सचिन चावरे, धम्मपाल कांबळे आणि चालक विनोद पवार यांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.
वृत्त संकलन: प्रतिनिधी माधव वाघमारे












