नांदेड १८ एप्रिल प्रतिनिधी
आगामी सण-उत्सव आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. ११ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (११ ते १७ एप्रिल) पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत ७३ गुन्हे दाखल केले असून, तब्बल ५० लाख ५२ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एका आठवड्यातील कारवाईचा लेखाजोखा
या विशेष मोहिमेतंर्गत गुटखा, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे:
- गुटखा विरोधी कारवाई: एकूण १२ गुन्हे दाखल करून ३० लाख ६० हजार ६११ रुपये किमतीचा गुटखा व वाहने जप्त करण्यात आली. यात परभणी ग्रामीण हद्दीतील १३.५८ लाखांची कारवाई आणि अर्धापूर येथील बनावट जर्दा कारखान्यावरील कारवाईचा समावेश आहे.
- अमली पदार्थ विरोधी कारवाई: गांजा विक्रीप्रकरणी १ गुन्हा दाखल करून १ लाख १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
- शस्त्र अधिनियम कारवाई: ६० गुन्हे दाखल करत १८ लाख ७९ हजार २३० रुपये किमतीचे ३ गावठी पिस्तुल, १० काडतूस, तलवारी आणि खंजीर जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय कारवाईचा तपशील (कोष्टक)
जिल्हा दाखल गुन्हे जप्त मुद्देमाल (गुटखा/शस्त्र/अमली पदार्थ) एकूण आरोपी नांदेड ३७ गुटखा, गांजा, १ अग्नीशस्त्र, ३० धारदार शस्त्रे ४० परभणी ११ गुटखा (बोलेरोसह), २ अग्नीशस्त्रे, १० धारदार शस्त्रे १३ हिंगोली ११ गुटखा, १० धारदार शस्त्रे १८ लातूर १४ गुटखा (कारसह), ७ धारदार शस्त्रे १८ एकूण७३५०,५२,३९१ रुपये किंमत८९
‘खबर’ हेल्पलाईनचे आवाहन
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा ‘खबर’ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांबाबत या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.
ही मोहीम पुढील आठवड्यात अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.












