नांदेड ७ मे (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तलवारी, खंजर आणि गुप्त्यांसह एकूण ४,७९६ घातक शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याच अनुषंगाने, ६ मे २०२६ रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांचे पथक बळीरामपूर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन करत होते.
यावेळी एक संशयित तरुण कमरेला खंजर आणि तलवार लावून फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव अभिजीत गिरीधर सातपुते (रा. बळीरामपूर) असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्याने ही शस्त्रे गुरुरामदास नगर येथून खरेदी केल्याची कबुली दिली.
४,७९६ शस्त्रांचा साठा जप्त
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीतील गुरुरामदास नगर येथील एका खोलीवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच तेथून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र खोलीची झडती घेतली असता तिथे शस्त्रांचा मोठा साठा आढळला. यामध्ये खालील शस्त्रांचा समावेश आहे:
- मोठ्या तलवारी: ३१५ नग
- छोट्या तलवारी: १३५ नग
- काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गुप्त्या: ३३८ नग
- विविध प्रकारचे खंजर: ३,३८७ नग (यात फोल्डिंग, कुकरी आणि फिंगर ग्रिप खंजरचा समावेश)
- इतर साहित्य: हातोडे, पाने, पक्कड आणि स्क्रू ड्रायव्हर.
अशा प्रकारे एकूण ४३,४८,०००/- रुपये किमतीची ४,७९६ शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
आरोपींवर गुन्हे दाखल
या प्रकरणात पोलिसांनी अभिजीत गिरीधर सातपुते (रा. बळीरामपूर) आणि जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर, नांदेड) यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ आणि ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मटवाड, आणि कर्मचारी वसंत केंद्रे, समीर अहमद, शंकर माळगे, संतोष पवार, चावरे, धम्मा कांबळे, गवेंदर सिरमलवार, रुक्मीनी कानगुले यांचा समावेश होता. पोलीस पथकाच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.












